जिंतूर | प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे कौटुंबिक वादातून अखाड्याला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे शेतीसाठी उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचलेगाव येथील तुकाराम वारकड यांच्या गट क्रमांक २२ मधील अखाड्याला त्यांच्या सख्ख्या भावाने आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आगीत अखाड्यात ठेवलेले पिंकलर सेट, ११ क्विंटल ज्वारी, फव्वारा, डीएपी खताच्या ६ बॅगा, उन्नती सोयाबीनच्या ५ बॅगा, मोटार स्टार्टर बॉक्स, सिलिंग फॅन, पेरणी यंत्र तसेच इतर साहित्य जळून खाक झाले.
तुकाराम वारकड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सख्खे भाऊ मल्हारी रनोजी वारकड आणि त्यांचा मुलगा विठ्ठल मल्हारी वारकड यांनी डिझेल टाकून जाणीवपूर्वक आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून FIR क्रमांक 0176 नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात BNS 2023 अंतर्गत कलम 326(F), 324(5), 351(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही क्षणातच अखाड्याने रौद्ररूप धारण केले. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तुकाराम वारकड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
