कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
बैलगाडी शर्यत क्षेत्रात आपल्या वेगाने आणि दमदार कामगिरीने विशेष ओळख निर्माण करणारा हरिपूर येथील बोंद्रे सरकार यांचा प्रसिद्ध बैल “हिंदकेसरी बुलेट छब्या” आज सर्वांना कायमचा सोडून गेला. या दुःखद घटनेमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
“बुलेट छब्या”ने आपल्या अफाट वेगाच्या जोरावर अल्पावधीतच अखंड राऊंड क्षेत्रात स्वतःचे आणि मालक महेश बोंद्रे सरकार यांचे नाव मोठ्या अभिमानाने उज्ज्वल केले होते. अनेक शर्यतींमध्ये दमदार कामगिरी करत त्याने शर्यतप्रेमींच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.
त्याच्या निधनाची बातमी समजताच कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. विविध भागांतील शर्यतप्रेमींनी “बुलेट छब्या”ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“बुलेट छब्या” हा केवळ बैल नव्हता, तर शर्यत क्षेत्रातील एक ओळख, एक अभिमान आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा भाग होता, अशा भावना अनेक शर्यतप्रेमींनी व्यक्त केल्या.
