गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनने हुलकावणी दिल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सूनचे आगमन झाले असले तरी पावसात खंड पडल्याने शेतकरी आणि नागरिक पावसाची चातकासारखी वाट पाहत होते.
अशातच रविवारी मुखई–शिक्रापूर परिसरात अखेर पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांसह बळीराजाने सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आडोशाला थांबले, तर काही ठिकाणी वाहतूकही मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामासाठी दिलासा मिळाला असून आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.



