चार डीजे वाहने जप्त; पोलिसांच्या कारवाईत तब्बल १ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
श्रीक्षेत्र माहूर, प्रतिनिधी : माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविल्याप्रकरणी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधितांवर माहूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी चार डीजे सिस्टीमसह वाहने ताब्यात घेतली असून, त्यांची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी लखमापूर बीट परिसरातील लांजी, शेकापूर व लखमापूर येथे गणेश विसर्जनासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लखमापूर तांडा येथील विसर्जन मिरवणुकीत दोन परवानाधारक आणि तीन विनापरवाना गणेश मंडळे सहभागी झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परवानाधारक महाराणी गणेश मंडळ आणि साई श्रद्धा गणेश मंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाचे उल्लंघन करून डॉल्बी सिस्टीमचा वापर केला. तसेच मोठ्या आवाजात मिरवणूक काढून पोलिसांनी दिलेल्या लेखी व तोंडी सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. मिरवणूक निर्धारित वेळेत न संपवता ती विनाकारण लांबविल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, गराशा, भाया आणि कन्हैया गणेश मंडळांनी परवानगी नसतानाही गणेशमूर्तीची स्थापना केल्याचा तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जमाव जमवून विसर्जन मिरवणूक काढल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
कारवाईदरम्यान महाराणी गणेश मंडळाचे वाहन क्रमांक MH 04 HD 4841, साई श्रद्धा गणेश मंडळाचे वाहन क्रमांक MH 04 EY 5147, भाया गणेश मंडळाचे वाहन क्रमांक MH 12 MV 2631 आणि कन्हैया गणेश मंडळाचे वाहन क्रमांक MH 14 LX 2572 अशी चार वाहने डीजे सिस्टीमसह ताब्यात घेण्यात आली. गराशा गणेश मंडळाचे डीजे वाहन मिरवणुकीतून निघून गेल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ताब्यात घेतलेल्या चार वाहनांसह डीजे सिस्टीमची अंदाजे किंमत अनुक्रमे ३२ लाख, ३४ लाख, ३५ लाख आणि ३६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारे एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी लखमापूर बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पुंडलिकराव गोपनवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे व पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके व पोलीस पथक करीत आहे.









