पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर परिणाम; चारा व पाण्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी
कणकोरी प्रतिनिधी :
गंगापूर तालुक्यातील कणकोरी गावात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व पशुपालक अडचणीत सापडले आहेत. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होत असून, जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
या परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची मागणी करत गंगापूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. कणकोरी परिसरातील परिस्थितीची शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व पशुपालकांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी तुषार शिंदे, मनोज पवार, वाल्मीक पवार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.









