पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड; शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
कवठेमहांकाळ प्रतिनिधी :
नागज येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. मल्लिका तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पालक बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी उपस्थित पालक व शिक्षकांनी एकमताने मल्लिका तांबोळी यांच्या नावाला संमती दिली.
मल्लिका तांबोळी या सामाजिक कार्यात सक्रिय असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
निवडीनंतर शाळेच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मल्लिका तांबोळी यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मल्लिका तांबोळी यांच्या निवडीबद्दल पालक व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.








