परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा अंबाजोगाई दूध महासंघाचे माजी सदस्य स्व. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दुःखद निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत फड कुटुंबियांचे सांत्वन केले.
स्व. वसंत (बापू) फड यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांनी कन्हेरवाडी गावाच्या विकासकामांमध्ये तसेच सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान दिले होते. मनमिळावू, धार्मिक व सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
गावातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाने कन्हेरवाडी परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. वसंत (बापू) फड यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि फड परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
