तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन
चांदूर रेल्वे :
छत्रपती शिवाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीज खंडित प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः महिलांना व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
लोकप्रिय नगरसेविका कल्पनाताई लांजेवार यांच्या पुढाकारातून आणि माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिला व नागरिकांनी चांदूर रेल्वे येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शहरातील वीज पुरवठा सुरळीत का ठेवला जात नाही, असा सवाल उपस्थित केला.
“मेंटेनन्सच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे सुरू आहेत का?” असा संतप्त सवाल करत त्यांनी देखभाल कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप केला.
छत्रपती शिवाजी नगर परिसरातील महिलांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे घरगुती कामे, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची भावना व्यक्त केली. रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाचा वाढता रोष पाहता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अखेर आंदोलकांसमोर नमते घेत, शहरातील तांत्रिक अडचणी दूर करून पुढील तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी वीरेंद्रभाऊ जगताप यांनी इशारा देत सांगितले की, “दिलेल्या मुदतीत समस्या सुटली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
मोर्चामध्ये अमोल होले, अनिस भाई सौदागर, श्रीनिवास सूर्यवंशी, राजीव लांजेवार, प्रफुल कोकाटे, रुपेश पुडके, सागर गरुड, सतपाल वरठे, रितेश शेळके, रोहित बाबर, राजश्री माने, पूजा यादव, सारिका हटवार, पद्मा हटवार, मेघा जाधव, अश्विनी कवळकर, ज्योती राऊत, संजीवनी राऊत, वंदना माने, मंगला गिरकुंज, पूजा मेहरे, संगीता आगाशे, माया लांजेवार, अनिकेत धुर्वे, सविता लांजेवार, दिपाली राठोड, उषा बाबर, सुजाता राऊत, अलका उईके, रेखा छकुले, रोहिणी देशमुख, सुनिता राऊत, किरण गिरकुंजे, वैशाली गजबे, वेदांत श्रीखंडे, शरद घासले यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
