कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी घरपट्टी (मालमत्ता कर) वाढीविरोधात तसेच नागरिकांवर अन्याय करणाऱ्या विविध निर्णयांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
आंदोलनाच्या प्रारंभी श्री छत्रपती शिवाजी Maharaj, श्री छत्रपती संभाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक न्याय, लोकशाही आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणाची शपथ घेण्यात आली.
कोपरगाव नगरपरिषदेने घरपट्टीत केलेली वाढ ही सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर अन्याय करणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढीव करामुळे मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार आणि सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोपरगावकर नागरिकांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असून, वाढीव घरपट्टी रद्द होईपर्यंत आणि नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत नगरपरिषदेच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.



