सोयाबीन पिकाच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी; शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी
प्रतिनिधी –
मालेगाव, जि. वाशिम :
अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप संजय धोत्रे यांनी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर २०२६) मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा केला. यावेळी त्यांनी जऊळका रेल्वे, उमरदरी आणि किन्हीराजा परिसरातील शेतांमध्ये जाऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ११.३० वाजता जऊळका रेल्वे येथून झाली. त्यानंतर दुपारी १ वाजता उमरदरी, १.३० वाजता किन्हीराजा आणि त्यानंतर शेतांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी परिसरातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या खासदार धोत्रे यांच्यासमोर मांडल्या.
चालू हंगामात पावसातील अनिश्चितता आणि प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. काही भागांत पिकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसानीची तातडीने दखल घेऊन सरसकट आर्थिक मदत व भरपाई जाहीर करावी, अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केली.
वाशीम-अकोला परिसरात यापूर्वीही सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
शेतकरी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यात उमरदरी परिसरातील जऊळका, वरदरी बुद्रुक, गणेशपूर आदी भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच अवलिया महाराज संस्थानचे उपाध्यक्ष उत्तमराव नाईक, मालेगावचे तहसीलदार पुंड साहेब, भाजप तालुका अध्यक्ष सुरेशराव मुंढे, सुरेश पाटील हगवने, जऊळकाचे सरपंच रमेश लांडगे, दिनेश राठोड यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





