सिन्नर | प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील वावी येथे विघ्नहर्ता प्रतिष्ठान आणि आयसीएआर ऊस संशोधन संस्था माध्यमातून जैविक नियंत्रण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एस.सी.एस.पी. कार्यक्रमांतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व मोफत साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम जगद्गुरु संत तुकाराम महाराज सभागृह, वावी येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात एस.सी. प्रवर्गातील १२८ शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन, मका आणि कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक शेतकऱ्याला छत्री आणि स्कूल बॅग देण्यात आली. यापूर्वी दोन महिन्यांपूर्वी खतांचेही वाटप करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी गीतांनी कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. ज्ञानेश्वर बोरसे (शास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्र) यांनी आधुनिक शेती, जैविक शेती पद्धती आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी तथा वावी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोमनाथ अण्णा कांदळकर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराज घराण्याचे वंशज हर्षलजी राजेभोसले यांनी केली.
विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार केशर आंब्याची रोपे देऊन करण्यात आला. यावेळी दीपक वेलजाळी (शिवसेना उपतालुकाप्रमुख), शिवदास घेगडमल, महेश खाटेकर, रविभाऊ कहांडळ, विठ्ठलरावजी राजेभोसले, स्नेहल भेंडाळे, प्रदीप गायकवाड, गणेश वेलजाळी आणि चंदूनाना पठाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश वेलजाळी यांनी विधवा महिला आणि बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक व आर्थिक उन्नतीचे कार्य उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर घेगडमल यांनी केले तर प्रा. कारभारी वेलजाळी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमास विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे सदस्य, लाभार्थी शेतकरी आणि वावी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कन्हुशेठ भुतडा, नंदूशेठ मालपाणी, उत्तम संधान, राकेश अनाप, किरण घेगडमल, माधुरी वेलजाळी, नीता पठाडे, अनिल घेगडमल आणि रामदास घेगडमल हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी आणि सामाजिक क्षेत्रात विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे.



