शहादा, दि. २५ (का.प्र.)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किट आणि वीज अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) शहादा विभागाकडून शहरातील वीजवाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, फांद्या तोडल्यानंतर त्या रस्त्यावरच टाकून दिल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील विविध भागांत वीज तारा सुरक्षित राहाव्यात म्हणून झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहेत. परंतु, तोडलेल्या फांद्या अनेक दिवस रस्त्याच्या कडेला पडून राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, झाडांच्या फांद्या हटविण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि महावितरण प्रशासनाची असतानाही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पावसामुळे या फांद्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी निर्माण होत असून, डास आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वारंवार होणारी अघोषित वीज कपात आणि आता रस्त्यावर पडून असलेल्या फांद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोशल मीडियावरही महावितरणच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तक्रारी केल्याचा दावा केला आहे.
नागरिकांनी महावितरण प्रशासनाला तात्काळ रस्ते साफ करण्याची आणि शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शहादेकरांनी दिला आहे.



