‘राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा’ : प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे
दोंडाईचा : प्रतिनिधी
“राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून वर्षभर विविध बौद्धिक, भावनिक, सामाजिक व शारीरिक विकासाचे उपक्रम राबविले जातात. श्रमदान, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, जनजागृती, आरोग्य विकास, साक्षरता, सामाजिक जाणीव जागृती आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा आहे,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी केले.
श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. उभाळे मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, स्थापना तसेच वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. एम. एस. उभाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. अमृता चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी मागील वर्षीच्या सात दिवसीय शिबिरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा. पी. डी. बोरसे यांनी मार्गदर्शन केले, तर प्रा. एस. एम. ठाकरे यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. डॉ. योगिता चौधरी, प्रा. मनीषा बावणे आणि प्रा. आर. पी. पाटील यांनी प्रयत्न केले. कृष्णा बागुल, शंकर गिरासे, अमर गिरासे आणि जयेश धनगर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.










