कुरुंदवाड | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर टीचर्स अवॉर्ड कार्यक्रम दि. 23 जून रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष रो. शैलेश व्होरा हे होते, तर सचिव रो. प्रशांत पट्टेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. प्रवीण कुंभोजकर तसेच असिस्टंट गव्हर्नर रो. कमलेश लढ्ढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, प्रार्थना आणि शिक्षकांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित करणाऱ्या विचारांनी करण्यात आली.
यावेळी विविध शाळांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा नेशन बिल्डर टीचर्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित शिक्षकांमध्ये सौ. शोभा कुमार पाटील (अंगणवाडी शिक्षिका, सैनिक टाकळी), श्री. अलगोंडा दत्तू पाटील (मराठी विद्या मंदिर, खिद्रापूर), सौ. रेखा राजाराम यादव (देशभक्त हायस्कूल, राजापूर), श्री. प्रमोद मालन सुरेश शिंदे (सा. रे. पाटील हायस्कूल, जांभळी), सौ. प्रिया दीपक चोगुले (सरस्वती हायस्कूल, टाकळीवाडी) आणि श्री. विठ्ठल परसा ढवळे (राजापूर-खिद्रापूर हायस्कूल, राजापूरवाडी) यांचा समावेश होता.
प्रमुख पाहुण्यांनी शिक्षकांचे समाजघडणीत असलेले महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. सन्मानित शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. अमित पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय इव्हेंट चेअरमन रो. डॉ. संजय पाटील यांनी करून दिला. आभार प्रदर्शन क्लब सचिव रो. प्रशांत पट्टेकरी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब कुरुंदवाडचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
