भाजपा शहराध्यक्ष महेश निकम यांच्या आयोजनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; धार्मिक परंपरेसोबत गोसेवेचा संदेश
पोलादपूर : वसुबारस या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, पोलादपूर शहराचे शहराध्यक्ष महेश निकम यांच्या आयोजनातून गोमाता पूजन व गोसेवा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाजपा जनसंपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजीनगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोमातेचे विधिवत पूजन व औक्षण करून तिला चारा आणि खाद्य अर्पण करण्यात आले. भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला असलेले महत्त्व अधोरेखित करत गोसेवा, धार्मिक परंपरांचे जतन आणि सेवाभावाचा संदेश उपस्थितांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा युवा मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, उज्ज्वला राजेश शेठ, माजी सभापती तथा नगरसेविका सौ. अंकिता महेश निकम, दुर्वा दरेकर, नीला तलाठी आणि प्रतीक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पोलादपूर शहरातील नागरिक, महिला भगिनी, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या धार्मिक व सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वसुबारसनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे शहराध्यक्ष महेश निकम यांनी मनःपूर्वक आभार मानले.










