Manwath प्रतिनिधी :
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली असून, कोल्हा शिवारातील उड्डाणपुलावर अर्टिगा कार पुलाच्या कठड्याला जोरदार धडकल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अर्टिगा कार कोल्हा शिवारातील उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार थेट पुलाच्या सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारच्या समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कारमधील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक हे खरबा गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांची नावे :
- गणेश लिंबाजी निर्वळ (रा. खरबा)
- माऊली वैजनाथ निर्वळ (रा. खरबा)
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे खरबा गावावर शोककळा पसरली असून, दोन्ही युवकांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
