शिरपूर प्रतिनिधी :
शिरपूर तालुक्यातील लौकी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पटांगणात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शाळेच्या परिसरात साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे पटांगण चिखलमय झाले असून विद्यार्थ्यांना वर्गात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करून शाळेचे पटांगण स्वच्छ करावे, अशी मागणी केली आहे. “प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि विद्यार्थ्यांना या समस्येतून कधी दिलासा मिळणार?” असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
