पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाईची मागणी…
पाटणबोरी प्रतिनिधी : पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वारा ग्रामपंचायतीमध्ये शासकीय अतिक्रमण हटाव मोहिमेचे वृत्तांकन करत असलेल्या एका पत्रकाराला शिवीगाळ, चारित्र्यहनन आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकार निलेश सिडाम (वय ३४) यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपी भारत गेडाम आणि अक्षय भारत गेडाम यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत वारा येथे प्रशासनामार्फत अधिकृत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती. या मोहिमेचे वृत्तांकन करण्यासाठी गावातील सरपंचांनी पत्रकार निलेश सिडाम यांना अधिकृतरीत्या बोलावले होते. त्यानुसार पत्रकार सिडाम हे घटनास्थळी व्हिडिओ चित्रीकरण करत असताना आरोपी भारत गेडाम आणि अक्षय गेडाम यांनी त्यांना अडवून “व्हिडिओ बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार सिडाम यांनी शासकीय कारवाईचे चित्रीकरण करणे कायदेशीर असल्याचे सांगितले असता आरोपी अक्षय गेडाम अधिक आक्रमक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. “ज्या दिवशी धमकी देईन त्या दिवशी तू जिवंत राहणार नाहीस,” अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनास्थळी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सचिव, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी आरोपींना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी अधिकाऱ्यांशीही उद्धटपणे वागणूक दिल्याचे सांगण्यात आले.
तक्रारीनुसार आरोपी भारत गेडाम हा तेलंगणा राज्यात शिक्षक म्हणून कार्यरत असून घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने पत्रकार निलेश सिडाम यांच्याविषयी “दारू पितोस, गांजा पितोस, हप्ते खातोस,” असे खोटे आणि मानहानीकारक आरोप केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कारवाईनंतर सर्व अधिकारी व पदाधिकारी सरपंचांच्या घरी उपस्थित असताना आरोपी अक्षय गेडाम याने पुन्हा तेथे येऊन “मी गावात कुठेही अतिक्रमण करीन, तुमच्याने जे होईल ते करून घ्या,” अशी उघड धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वीही गावठाण जमिनीवरील बेकायदेशीर खोदकामाचे वृत्तांकन करताना पत्रकार निलेश सिडाम यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले असून, सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ व ऑडिओ पुरावेही पोलिसांकडे सादर करण्यात आले आहेत.
पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची मागणी
कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकाराला धमकावणे, मानसिक छळ करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकारांविरोधात आरोपी भारत गेडाम आणि अक्षय गेडाम यांच्यावर ‘महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) कायदा’ अर्थात पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार निलेश सिडाम यांनी केली आहे.
या प्रकरणात पांढरकवडा पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









