येवला | प्रतिनिधी :
येवला-मनमाड राज्य महामार्गावरील रस्त्याच्या कडेला मुरुमाऐवजी माती टाकण्यात आल्याने पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून प्रवासी, वाहनधारक तसेच पायी चालणारे वारकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या प्रकारामुळे महामार्ग अपघाताचा सापळा बनल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या साईड पट्ट्यांवर (शोल्डर्स) मुरुम टाकणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने माती टाकली. सततच्या पावसामुळे ही माती चिखलात रूपांतरित झाली असून वाहने रस्त्याखाली उतरविल्यास ती थेट चिखलात रुतत आहेत.
विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांना जागा देताना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे. अनेक दुचाकी घसरल्याच्या घटना घडल्या असून काही चालक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. काही वाहने पलटी होता होता वाचल्याचेही सांगण्यात आले.
या मार्गावरून पायी जाणारे वारकरी तसेच रस्त्यालगतच्या गावांतील नागरिकही चिखलामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून मुरुम टाकून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

