जत | प्रतिनिधी
जत शहरातील मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने बाजारासाठी येत असल्याने प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होत असून नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.
जत नगरपरिषदेमार्फत आठवडी बाजार भरविण्यात येत असला तरी बाजार परिसरात योग्य नियोजन नसल्याने नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी विक्रेते बसत असल्याने तसेच काही फळविक्रेते चारचाकी वाहनांमधून विक्री करत असल्याने रस्त्यांवर अतिक्रमण वाढत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
महाराणा प्रताप चौक, बनाळी कॉर्नर, मटण मार्केट, तेली गल्ली, पेठेतील हनुमान मंदिर परिसर आणि मुख्य बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी अधिक तीव्र होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त कर्मचारी मुख्य गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून प्रभावी नियोजन करण्याची मागणी होत आहे.
याशिवाय शहरात अल्पवयीनांकडून वाहन चालविणे, दुचाकींवर तिप्पट प्रवास करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढत असल्याबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकारांवर नियमित कारवाई करून कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक शिस्त कायम राखावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
