अमरावती | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
प्रथम परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कैकारीपुरा रोड येथे छापा टाकून रेतीने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेण्यात आली. या कारवाईत ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर शेघाट पोलीस स्टेशन हद्दीतील पुसला टोल प्लाझा परिसरात रेतीने भरलेले दोन ट्रक पकडण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संबंधित आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
