तारापूर (जि. पालघर) | प्रतिनिधी :

पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील कुडण गावात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांच्या सुमारे दोन एकरांवरील केळी बागेला मोठा फटका बसला असून, १,५०० पैकी सुमारे ८०० केळीची झाडे उन्मळून पडली किंवा गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे सुमारे १.८० ते २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर सहाय्यक कृषी अधिकारी योगेश साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायतीचे ब वॉर्ड युवा सदस्य राहुल ठाकूर, शेतकरी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. राहुल ठाकूर यांनी शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, पंचनाम्याच्या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे काही सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शेतकरी अनिल मोरेश्वर म्हात्रे यांनी शासनाने पंचनामा लवकर मंजूर करून योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या केळी उत्पादकांना तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सरपंचांची प्रतिक्रिया
दरम्यान, या संदर्भात सरपंच सौ. विजया म्हात्रे यांनी सांगितले की, “मुसळधार पावसामुळे मी पालघर येथे अडकले होते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आले नाही. मात्र, मी दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधला असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.”
