
मारेगाव | प्रतिनिधी :
मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोड सुरक्षा अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व ऑटो चालक व मालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत पोलीस निरीक्षक सागर दानडे यांनी अल्पवयीन किंवा विनापरवाना व्यक्तींनी ऑटो चालवू नये, तर केवळ वैध परवाना (लायसन्स) असलेले आणि अनुभवी चालकांनीच ऑटो चालवावेत, असे स्पष्ट निर्देश दिले. शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून दिलेल्या या उपजीविकेच्या साधनाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिला, शाळकरी मुली आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना देत, प्रवाशांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालक अथवा मालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच सर्व ऑटो चालकांनी वाहनाचे लायसन्स, विमा, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आणि इतर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, जेणेकरून प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
ही बैठक मारेगाव पोलीस ठाण्यात पार पडली. बैठकीस तालुक्यातील मोठ्या संख्येने ऑटो चालक व मालक उपस्थित होते. रोड सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने यापुढेही जनजागृती सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.




