मिरज आणि पंचक्रोशीतील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदेवता असलेल्या ब्राह्मणपुरी मधील श्री अंबाबाई मंदिरासह प्रत्येक घरात आज घटस्थापने नंतर चैतन्यदायी अशा शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. यावर्षी अश्विन शुद्ध तृतीया या तिथी मध्ये वृद्धी झाल्याने नवरात्री उत्सव दहा दिवस चालणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. नवरात्र उत्सवासाठी मिरज सांगली सह पंचक्रोशीतील गावे भक्तिमय झाली आहेत. दरम्यान घरोघरी घटस्थापना आणि नवरात्र उत्सवासाठी तयारी पूर्ण झाली आहे. बाजारपेठेमध्ये सुगड, पत्रावळी, नाडापुडी, माती, बियाणे आणि विविध धार्मिक विधी साठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठ फुलून गेली होती. श्री अंबाबाई मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजाअर्चा होऊन मंदिराच्या गाभाऱ्यात मानकऱ्यांच्या हस्ते घटस्थापना होईल. नवरात्र उत्सव काळात रोज विविध रूपामध्ये जडावी सालंकृत पूजा बांधण्यात येते. मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्री उत्सवाचे आणखीन वैशिष्ठ म्हणजे इथे साजरा होणार नवरात्र संगीत महोत्सव. हा महोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. श्री अंबाबाई देवस्थान ट्रस्ट आणि श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव समिती तर्फे हा संगीत महोत्सव साजरा होतो देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक दिग्गज कलाकार आपली संगीत सेवा श्री अंबाबाई चरणी अर्पण करत असतात. तसेच दसऱ्याला या नवरात्री उत्सवाची सांगता भव्य अशा पालखी सोहळ्याने होते पूर्ण मिरज नगरीला हि पालखी प्रदक्षिणा घालते. या देवस्थान चे मानाचे चंदूरकर देशपांडे घराणे कोडोलीकर सरकार घराणे आणि मंदिराचे पुजारी गुरव घराणे यांच्याकडून श्री अंबाबाई देवस्थान मध्ये सोइ सुविधा पुरवल्या जातात.
Discussion about this post