धडगाव | प्रतिनिधी
शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स, नंदुरबार संघटनेने केली आहे. यासंदर्भात तहसीलदार, शहादा आणि जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
संघटनेच्या निवेदनानुसार, ११ जुलै २०२६ रोजी शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच बाधित विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार आणि आवश्यक आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यातील सर्व समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
याशिवाय, सध्या सुरू असलेली किचन शेड पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच स्वयंपाक करण्याची व्यवस्था सुरू करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना ताजे, स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जबाबदारी निश्चित करून प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणीही बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.
