
मानवत | प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे वानर आणि माकडांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला असून, त्यांच्या बंदोबस्ताची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी गावकऱ्यांनी मानवतच्या तहसीलदारांना निवेदन देऊन गावातील वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. गावात वानर व माकडांचा मुक्त संचार वाढल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काही वानरांनी नागरिकांच्या अंगावर धाव घेण्याचे तसेच चावण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होण्यापूर्वी वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील वृक्षतोड आणि नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांकडे वावर वाढत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आहे.
याबाबत ज्ञानेश्वर पठाडे, नामदेव काळे आणि दत्ता नारायण पठाडे यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
