
सारथी महाराष्ट्राचा न्यूज | प्रतिनिधी
उंबरवाडी गावात चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दराडे यांच्या उपस्थितीत, सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर तसेच गावातील महिला भगिनींसह अवैध दारूविक्रीविरोधात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गावातील अवैध दारू विक्रेत्यांना बेकायदेशीर दारूविक्री तात्काळ बंद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीनंतर पोलीस व ग्रामस्थांनी संयुक्तपणे परिसरात शोधमोहीम राबवून हातभट्टीची दारू तयार करण्याची व लपवून ठेवण्याची ठिकाणे शोधून काढली. या ठिकाणी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली.
यावेळी परिसरात अल्पवयीन मुलांनाही दारू पाजली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आल्याने अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. दारूच्या व्यसनामुळे अपघात, कौटुंबिक वाद आणि सामाजिक समस्या वाढत असल्याने अवैध दारू व्यवसायाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी युवकांना आणि बालमित्रांना व्यसनमुक्तीचा संदेश देत, “व्यसन सोडा, शिक्षणाकडे वळा. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू,” असे आवाहन केले.
तसेच, आलेगाव येथे लवकरच व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा मानस असून, व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन व उपचाराच्या माध्यमातून नवजीवन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अवैध दारूविक्रीविरोधातील ही कारवाई आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरत असून, गावकऱ्यांनीही अशा उपक्रमांना सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
