पारोळा (प्रतिनिधी):दिनांक ५ सप्टेंबर २०२६, वार शनिवार रोजी येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित ‘परिश्रम’ दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासो. डॉ. श्री. योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून भगवान श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे सादरीकरण केले.
शारीरिक आणि मानसिक आव्हानांवर मात करत, शिक्षकांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी बाल गोपाळांचे थर लावून दहीहंडी फोडली. या दृश्याने उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले आणि दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या आगळ्यावेगळ्या दहीहंडी सोहळ्याचे आणि दिव्यांग मुलांच्या या अनोख्या उत्साहाचे संपूर्ण पारोळा शहरातून व परिसरातून कौतुक होत आहे.








