*श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी):
कोणतेही कर्ज घेतलेले नसताना श्रीराम फायनान्स कंपनीने CIBIL रिपोर्टमध्ये परस्पर ४ लाख रुपयांचे अनधिकृत ‘बिजनेस लोन’ दाखवून एका सामान्य नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून चुकीची नोंद न हटवल्यास १५ सप्टेंबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
*नेमका प्रकार काय?*
उक्कडगाव (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी प्रविणकुमार केरु शेंडगे यांनी दोन वर्षांपूर्वी श्रीराम फायनान्स कडून दुचाकीसाठी कर्ज (Two Wheeler Loan) घेतले होते. सदर कर्जाचे सर्व हप्ते त्यांनी वेळेवर भरले असून केवळ शेवटचे तीन हप्ते शिल्लक आहेत. मात्र, उर्वरित हप्त्यांची माहिती घेण्यासाठी जेव्हा त्यांनी आपला CIBIL रिपोर्ट तपासला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. संबंधित फायनान्स कंपनीने त्यांच्या नावावर कोणतेही अर्ज किंवा संमती नसताना सुमारे ₹४ लाखांचे ‘बिजनेस लोन’ दाखवल्याचे समोर आले.तर संबंधित कंपनीच्या श्रीगोंदा कार्यालयात विचारणा केली असता वरुन तांत्रिक अडचणी असल्यामुळे असे झाले आहे अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
CIBIL स्कोअरवर परिणाम आणि अन्याय
या चुकीच्या व अनधिकृत नोंदीमुळे प्रविणकुमार शेंडगे यांच्या क्रेडिट स्कोअरवर गंभीर परिणाम झाला असून भविष्यात त्यांना कोणतेही कर्ज मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. “आम्ही कर्ज घेतले नसताना त्याची जबाबदारी आमच्यावर टाकणे हा अन्याय आहे,” अशी भावना शेंडगे यांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम
या गंभीर प्रकरणी लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार, श्रीगोंदा यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे संबंधित फायनान्स कंपनी व प्रशासनाला २ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दोन दिवसांत ही चुकीची नोंद CIBIL मधून हटवून लेखी स्पष्टीकरण न दिल्यास, मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजीपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर लोकशाही व शांततामय मार्गाने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस श्रीराम फायनान्स व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा नेते उत्तमआप्पा रोकडे,तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे,जेष्ठनेते नंदुभाऊ ससाणे,दत्ताभाऊ शिंदे,सिताराम कोरडकर,रामभाऊ मोरे,मधुकर सकट, संतोष शेंडगे,मंगेश गायकवाड,मनोज शेलार, प्रविणकुमार शेंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलीस स्टेशन श्रीगोंदा, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) कर्जत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते तसेच श्रीराम फायनान्स कार्यालयाला पाठवण्यात आल्या आहेत.





