पाचोरा:
गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंतेत सापडलेल्या पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या पावसाने सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना मोठा आधार दिला असून, शेतांमध्ये एक प्रकारे नवसंजीवनी निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून उन्हाचा तडाखा आणि पाण्याचा तुटवडा यामुळे संपूर्ण तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांत पिके करपून जाण्याच्या स्थितीत होती. अशा अत्यंत हताश वातावरणात गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मृतप्राय झालेल्या पिकांमध्ये नवचैतन्य फुंकले आहे.
उत्पादनात घटीची भीती कायम
जरी या पावसाने पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी गेल्या महिना-दीड महिन्याच्या भीषण ताणानंतर पिकांचे झालेले नुकसान पूर्णपणे भरून निघणे शक्य नाही. पाण्याअभावी पिके आधीच करपून गेल्याने या वर्षी उत्पन्नात मोठा फटका बसणार, अशी हतबलता आणि नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यासाठी तसेच ही नवसंजीवनी टिकून राहण्यासाठी आगामी दिवसांत आणखी मोठ्या पावसाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे बळीराजा अजूनही आकाशाकडे डोळे लावून मोठ्या पावसाची आस धरून आहे.







