आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीची पंचायत समिती लांजा प्रशासनाकडून दखल; त्रिसदस्यीय समिती नियुक्त
लांजा : ग्रामपंचायत हर्दखळे येथील सन २०१५ ते २०२० या कालावधीतील माजी सरपंच राजश्री लाड तसेच त्यानंतरच्या प्रशासकांच्या कार्यकाळातील विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजाबाबत दाखल झालेल्या तक्रारीची पंचायत समिती लांजा प्रशासनाने दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
आपले सरकार पोर्टलवर संबंधित कामकाजाबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी नियुक्त करण्याबाबत पंचायत समिती लांजा कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले होते. त्यानंतर प्राप्त आदेशानुसार ग्रामपंचायत हर्दखळे येथील संबंधित बाबींची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
समितीमार्फत ग्रामपंचायतीतील संबंधित विकासकामे, आर्थिक व्यवहार तसेच प्रशासकीय कामकाजाबाबतच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर समितीचा अहवाल संबंधित प्रशासनाकडे साद केला जाणार असून, त्यानंतर तक्रारीतील आरोपांबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधितांना लेखी कळविले आहे. त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती झाल्यानंतर तक्रारीवरील कार्यवाही पुढे सुरू करण्यात आली असून, चौकशी अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








