१०० रक्तदाब व ६० मधुमेह रुग्णांची तपासणी; ४० रुग्णांची नेत्रतपासणी, मोफत औषधोपचार व शस्त्रक्रियेचे नियोजन
धारासुर : ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्यावर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एनसीडी (असंसर्गजन्य आजार) आणि आरोग्य तपासणीसंदर्भातील विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी महारुद्र गणेश मंडळाच्या माध्यमातून गौंडगाव येथे एनसीडी व जनरल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.
या शिबिरात रक्तदाबाची तपासणी करण्यात आलेल्या १०० रुग्णांना तसेच रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आलेल्या ६० रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र धारासुरच्या माध्यमातून आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले. संबंधित रुग्णांना पुढील काळातही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत औषधांचा डोस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
४० रुग्णांची नेत्रतपासणी
शिबिरात ४० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. आवश्यक असलेल्या रुग्णांना माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार असून, तीन दिवसांत चष्म्यांचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मोतीबिंदू असलेल्या सात रुग्णांची आणि टेरिझम ऑपरेशनची आवश्यकता असलेल्या दोन रुग्णांची पुढील तपासणी करून त्यांच्यावर येत्या १५ दिवसांत आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात धारासुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जुनेद शेख व त्यांच्या टीमने तसेच प्राईड इंडिया एनजीओचे श्री. गिनगिने, श्री. काकडे, डॉ. स्नेहल कदम व त्यांच्या टीमने रुग्णांना आरोग्य सेवा दिली.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तपासणी, औषधोपचार व आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना वेळ व आर्थिक खर्चाची बचत होण्यास मदत होत आहे.







