महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) व किसान सभेची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
परभणी/प्रतिनिधी :
मानवत तालुक्यात गेल्या ५० ते ५५ दिवसांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ७० हजार रुपये आणि भूमिहीन शेतमजुरांना ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन (लाल बावटा) आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत तहसीलदार, मानवत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पावसाअभावी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात करपले असून कापूस व तूर पिकांचीही अवस्था अत्यंत खराब झाली आहे. शेतातील कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेक मजुरांना नाशिक, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.
शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ७० हजार रुपये तसेच भूमिहीन शेतमजुरांना ३० हजार रुपये श्रम नुकसानभरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून नवीन पीककर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पीक विम्यातील रद्द केलेले तीन ट्रिगर पुन्हा सुरू करून पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करावी. ठेका किंवा बटाईने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही एकरी ७० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करून त्यांनाही नुकसानभरपाईचा लाभ द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २०२५-२६ मधील १७ हजार ५०० रुपयांची पीक विमा रक्कम तातडीने द्यावी, निराधार, विधवा, वृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, तसेच मागेल त्याला रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने काम उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ सुरू करावा, कसत असलेल्या गायरान जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, घरकुल योजनेचे थकीत हप्ते जमा करावेत, सर्व पिकांसाठी १०० टक्के पीक विमा भरपाई मंजूर करून तातडीने वाटप करावे, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांची शासनाने तातडीने पूर्तता करावी. अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) व किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर कॉ. अशोक बुरखुंडे, रुक्मिणी शिंदे, कॉ. नंदकुमार लांडगे, गयाबाई साबळे, रामभाऊ आठवे, प्रयागबाई साळवे, प्रयागबाई काळे, विष्णू लांडगे, सुदाम भिसे, नारायण टगुळे, भीमराव पांचाळ, बायणाबाई पवार, आश्रुबाई आवचार, लक्ष्मी आवचार, बळीराम खंदारे, अमृत खटे, मधुकर आवचार, मंडूबाई पवार, पार्वती कदम यांच्यासह शेतकरी व शेतमजूर महिला-पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









