‘हेल्मेट दंडापासून वाचण्यासाठी नव्हे, जीविताच्या सुरक्षेसाठी’; १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम
लातूर (प्रतिनिधी) : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलिसांनी हेल्मेट वापराबाबत कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर २०२६ पासून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा उद्देश केवळ वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे नसून, अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करणे हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर केल्याने डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतीचा धोका कमी होण्यास मदत होते.
मार्चपासून जनजागृती, त्यानंतर सक्ती
हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीपूर्वी लातूर पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देत दुचाकीस्वारांनी स्वतःहून हेल्मेट वापरावे, असे आवाहन करण्यात आले. मात्र अपेक्षित प्रमाणात हेल्मेट वापर वाढला नसल्याने १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली.
या मोहिमेची अंमलबजावणी सुरुवातीला राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर करण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १८ हजार ४२४ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनाही हेल्मेटसक्तीतून सूट नाही
हेल्मेट नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनीही नियमांचे पालन करावे, अशी भूमिका पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घेतली आहे. मोहिमेपूर्वी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ५८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. संबंधित उल्लंघनांची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.
लातूर पोलिसांच्या मते, हेल्मेटसक्ती ही केवळ दंडात्मक कारवाई नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित मोहीम आहे. जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत शिस्त निर्माण होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
दुचाकीस्वारांनी स्वतः हेल्मेट वापरण्यासोबतच सोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर प्रत्येक दुचाकीस्वाराने नियमितपणे करावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.








