महाआरती, विविध उपक्रमांसह महाप्रसाद भंडाऱ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) : संभाजीनगर परिसरातील मानाच्या राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव यंदा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसह संपन्न झाला.
ह. भ. प. शास्त्री मदनलाल भटजी महाराज यांच्या वेदशास्त्रोक्त मंत्रोच्चारात तसेच नवदाम्पत्य सौ. साक्षीबेन व सौरभ बी. बोरसे यांच्या शुभहस्ते श्री महा गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत (नानाभाऊ) निकम, ज्येष्ठ नागरिक परमेश्वर चव्हाण, पंढरीनाथ महाजन, नरोत्तमभाई पटेल, राकेश अग्रवाल, सी.ए. रूपेश अग्रवाल, लखन अग्रवाल, प्रतीक चव्हाण, समाधान चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक, महिला व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सव काळात दररोज सकाळी व सायंकाळी ८.३० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले. विविध दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच परिसरातील भाविकांच्या हस्ते आरती पार पडली.
उत्सवादरम्यान शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी सहकाऱ्यांसह मंडळाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक विषयांवर चर्चा केली. नगराध्यक्ष अभिजीत पाटील, सौ. प्रितीबेन अभिजीत पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील व उपनगराध्यक्ष सौ. माधवीताई मकरंद पाटील यांनीही मंडळाला भेट देऊन आरतीचा मान स्वीकारला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाचे प्रेरणास्थान स्वर्गीय भवरलालजी जगरूपजी प्रजापती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या धर्मपत्नी गं. भा. चुनिदेवी भवरलालजी प्रजापती व ज्येष्ठ सुपुत्र मनसुखजी प्रजापती परिवाराच्या सौजन्याने १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अन्नदानाचा परिसरातील शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
संपूर्ण गणेशोत्सव काळात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संभाजीनगर परिसर दुमदुमून गेला. गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष लखन अग्रवाल, कार्यकारी मंडळ आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.








