अनरद बारी येथील रेणुकादेवी मंदिर परिसरात विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक उपक्रम
शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) : सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सामाजिक वनीकरण क्षेत्र, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने अनरद बारी येथील रेणुकादेवी मंदिर परिसरात बीजगणपती व सीड बॉल टाकण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर व सहाय्यक वनसंरक्षक अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन व जैवविविधतेबाबत जनजागृती करणे तसेच पावसाळ्यात नैसर्गिक पद्धतीने विविध वनस्पतींची वाढ होण्यास चालना देणे हा होता.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंदिर परिसरात बीजगणपती व सीड बॉल टाकून निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला. ‘आजचा सीड बॉल, उद्याचे हिरवेगार भविष्य’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली.
यावेळी वनक्षेत्रपाल निलेश चव्हाण, वनपाल सुजितकुमार बेडसे, ईश्वर चव्हाण, अश्विनी चव्हाण तसेच वनरक्षक भूपेश तांबोळी, गंगोत्री गवळे, रेखा खैरनार व दिपाली पाटील उपस्थित होते.
उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, ज्येष्ठ प्रा. व्ही. सी. डोळे, प्रा. ए. पी. पाटील व प्रा. विना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. कल्पना निकुंभ व प्रा. मधुकर ठाकरे यांनी स्वयंसेवकांच्या सहकार्याने उपक्रमाचे नियोजन केले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रकाश चौधरी, प्रा. विशाल पाटील, प्रा. उदय पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या पर्यावरणपूरक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गसंवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचविला.









