शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शहादा येथे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने हिताची (HITACHI), वडोदरा कंपनीतर्फे कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी हिताची कंपनीचे टीओपी मॅनेजर प्रशांत टी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील विविध टप्प्यांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३ लाख ते ३.५० लाख रुपयांपर्यंतचे वेतन पॅकेज देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे नियोजन इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. प्रशांत आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी प्रा. गिरीष चौधरी, प्रा. पंकज पाटील, प्रा. वैभव काळे, प्रा. जुनेद शेख, प्रा. भूषण अलोनी, प्रा. किशोर चौधरी, प्रा. सुजित चौधरी व श्री. विलास पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.
महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राशी थेट जोडण्यासाठी तसेच रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण सातत्याने राबविले जातात. या कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करण्यासोबतच उद्योगक्षेत्रातील रोजगाराची संधी मिळाली.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एच. जी. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कॅम्पस ड्राइव्हमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, संचालक मयूरभाई पाटील व प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








