मुख्याधिकाऱ्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व रिपाइंचे निवेदन
दुधनी, ता. अक्कलकोट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने दुधनी नगरपरिषदेतही माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
माहिती अधिकार अधिनियम २००५ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नगरपरिषद कार्यालयात जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक असलेले फलक लावावेत, माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ४ अन्वये आवश्यक माहिती स्वतःहून प्रसिद्ध करावी, तसेच नागरिकांमध्ये माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा शिवयोगी झळकी, मुस्लिम आघाडी शहराध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते महेंदीमिया जिडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र इंगळे, बसवण्णा कोतली, भगवंत कोळी, पत्रकार निंगप्पा निंबाळ, कृष्णा धोडमणी आदी उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत सोलापूर जिल्हाधिकारी तसेच अक्कलकोट तहसीलदार यांनाही सादर करण्यात आली आहे.








