कृषी विभागाच्या पाहणी व मार्गदर्शनाचा अभाव असल्याचा आरोप; अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा सवाल — कैलाशभाऊ कोरेत
अहेरी : प्रतिनिधी
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व ग्रामीण भागात यंदाच्या खरीप हंगामातील धान पिकावर विविध रोगराई तसेच किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
धान पिकावर रोगराई व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतानाही कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राची पुरेशी पाहणी, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आवश्यक उपाययोजना होत नसल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांनी केला आहे.
अतिदुर्गम भागातील अनेक गावांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी व कृषी सहाय्यक नियमितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत नसल्याने पिकांवरील रोग व किडींची योग्य वेळी ओळख करणे तसेच त्यावर उपाययोजना करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे कोरेत यांनी म्हटले आहे.
“कृषी सहाय्यकांची नियुक्ती असतानाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन होत नसेल, तर अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांचा वाली कोण?” असा सवाल कैलाशभाऊ कोरेत यांनी उपस्थित केला.
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास वाढलेल्या शेती उत्पादन खर्चाचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन बाधित धान क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करावी, रोग व किडींचे अचूक निदान करावे आणि योग्य औषधोपचार व फवारणीबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी मागणी कैलाशभाऊ कोरेत यांनी केली आहे.
तसेच बाधित क्षेत्राची नोंद घेऊन आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.








