मारेगाव–मार्डी रस्त्यावर अपघात; बसच्या वेळ व वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांचे प्रश्न, चौकशीची मागणी
मारे, प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील शेगाव सर्कलमधील डोंगरगाव येथील २६ वर्षीय शेतमजूर युवकाचा मारेगाव–मार्डी रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रमेश दादाराव मेश्राम असे मृत युवकाचे नाव आहे. मारेगाव–मार्डी रस्त्यावरील श्री राम किराणा दुकानासमोर हा अपघात झाल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असून, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
सदर बस ही खासगी कॉन्व्हेन्टची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित बसची तांत्रिक तपासणी, आवश्यक कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र तसेच चालकाची पात्रता व वाहन चालविण्याच्या परिस्थितीची संबंधित विभागाने तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर बसच्या वाहतुकीबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
मृत रमेश मेश्राम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनामुळे मेश्राम कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघाताची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








