अमित सावंत यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल; सभापती गणेश राणे यांच्या हस्ते गौरव
देवगड : प्रतिनिधी
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत देवगड तालुक्यात स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी अमित सावंत यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती देवगड येथे आयोजित कार्यक्रमात सभापती गणेश राणे यांच्या हस्ते अमित सावंत यांचा गौरव करण्यात आला.
कुणकेश्वर गावातील स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविणे, परिसर स्वच्छ व सुंदर ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अमित सावंत यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सभापती गणेश राणे यांनी अमित सावंत यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनीही स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत अमित सावंत यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अमित सावंत यांच्या सत्कारामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.









