पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; टँकरचालकावर कारवाई करण्याचे सिडकोचे संकेत
कळंबोली प्रतिनिधी : कळंबोली परिसरात नागरिकांना अपुरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू असतानाच सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या टाकीतून पाणी भरलेला टँकर सेक्टर १४, कळंबोली येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला पाणीपुरवठा करताना आढळून आला. या प्रकारामुळे सिडकोच्या पाणीवाटप व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबोलीतील समाजसेवक प्रशांत रणवरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधित टँकरचा पाठलाग केला. त्यानंतर सेक्टर १४ येथील बांधकामस्थळी टँकरमधून पाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे सिडकोच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून भरलेले पाणी नेमके कुठे आणि कोणाच्या परवानगीने वापरले जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
या प्रकाराबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत चहारे यांनी संबंधित टँकरचालकाने परस्पर हा प्रकार केल्याचे सांगितले असून, चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कळंबोलीतील अनेक भागांत नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांत ठराविक वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सिडकोच्या टाकीतून पाणी भरलेला टँकर बांधकामस्थळी पाणी देताना आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
पाणीटंचाईच्या काळात सिडकोच्या टँकरमधील पाणी बांधकामासाठी कसे पोहोचले, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रशांत रणवरे यांनी केली आहे. टँकरच्या वापराची नोंद, पाणी भरण्याची व वितरणाची परवानगी तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींची भूमिका यांचीही तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, सिडको प्रशासनाच्या तपासणीत या प्रकाराबाबत नेमकी काय माहिती समोर येते आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे कळंबोलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.








