चाकणमधील आगीच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांची मागणी; जोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करण्याची सूचनाही
पिंपरी-चिंचवड : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत उद्योग, गोदामे आणि नागरी वसाहतींचा झपाट्याने विस्तार होत आहे. या पार्श्वभूमीवर मोई येथे नवीन अग्निशमन केंद्र किंवा उपकेंद्र उभारावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
चाकण परिसरातील आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेची उपलब्धता आणि आपत्कालीन प्रतिसाद क्षमतेचा आढावा घेण्याची गरज असल्याचे लांडगे यांनी म्हटले आहे. पीएमआरडीए, एमआयडीसी, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे संभाव्य जोखमीच्या भागांचे सर्वेक्षण करून आपत्कालीन प्रतिसादाचा कालबद्ध आराखडा तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
मोई परिसरासह चाकण एमआयडीसीतील उद्योग, कार्यशाळा, गोदामे, भंगार साठवणूक केंद्रे तसेच लगतच्या नागरी वसाहतींची पाहणी करून संभाव्य अग्निधोके निश्चित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, रस्त्यांची स्थिती, पाण्याची उपलब्धता, मनुष्यबळ आणि बचाव उपकरणांची उपलब्धता यांचाही आढावा घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
“वाढत्या वसाहती आणि उद्योगांच्या तुलनेत अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे जोखमीच्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करून नवीन अग्निशमन केंद्रांचा कालबद्ध आराखडा निश्चित करावा,” असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
मोई येथे अग्निशमन केंद्र किंवा उपकेंद्र उभारल्यास परिसरातील औद्योगिक व नागरी भागात आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.







