निवृत्त न्यायमूर्ती तुकाराम चव्हाण यांच्या उपस्थितीत कांबळे, गावडे व चव्हाण यांचा गौरव
भूम प्रतिनिधी
पखरूड : ‘फौजींचे गाव’ म्हणून धाराशिव जिल्ह्यात लौकिक मिळवलेल्या पखरूड गावात देशसेवा बजावून निवृत्त झालेल्या तीन माजी सैनिकांचा ग्रामस्थांच्या वतीने गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. रणजित अण्णासाहेब चव्हाण, श्रीराम महादेव कांबळे आणि दयानंद कारभारी गावडे यांच्या प्रदीर्घ देशसेवेबद्दल त्यांचा सन्मान करून कृतज्ञतापूर्वक सलाम करण्यात आला.
देशाच्या सीमेचे रक्षण करत आयुष्याची अनेक वर्षे देशसेवेसाठी समर्पित करणाऱ्या या तीन वीर सुपुत्रांच्या सन्मानामुळे पखरूड गावात देशभक्तीचा अभिमान पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
या सन्मान सोहळ्यास निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश तुकाराम चव्हाण, प्रताप देशमुख, राहुल भट्टी, प्रा. शाहू चव्हाण, काकासाहेब चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विष्णू चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी माजी सैनिकांच्या देशसेवेचे कौतुक करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.









