१० महिन्यांच्या मिनिट्स बुकमध्ये नोंदी नसल्याचा आरोप; CEO रत्नागिरींकडे किरण चव्हाण यांचा सवाल
लांजा : हर्दखळे ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या तक्रारींवरून आता प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या विविध बाबींच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असली, तरी चौकशी समिती स्थापन होण्यापूर्वी घडलेल्या कथित प्रकारांची जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का, असा सवाल किरण दत्ताराम चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे केला आहे.
ग्रामसभा व ग्रामपंचायत बैठकींच्या सुमारे १० महिन्यांच्या मिनिट्स बुकमध्ये नोंदी झाल्या नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती प्रशासनाला देऊनही संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र कारवाई झाली आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच हर्दखळे ग्रामपंचायतीशी संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचीही चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“केवळ चौकशी समिती नेमणे पुरेसे नाही. दहा महिन्यांच्या मिनिट्स बुकमध्ये नोंदी का झाल्या नाहीत, याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. लांजा पंचायत समितीचे BDO कार्यालय संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की त्यांना पाठिशी घालणार?” असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.
आता CEO रत्नागिरी आणि BDO लांजा या प्रकरणी काय भूमिका घेतात आणि संबंधितांवर कारवाई होते का, याकडे हर्दखळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






