५ ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला ऐतिहासिक आणि व विशेष महत्त्व आहे. ५ ऑक्टोबर १९६६ रोजी पॅरिस येथे युनेस्कोच्या सहकार्याने आयोजित विशेष परिषदेत ‘शिक्षकांच्या स्थितीबाबत युनेस्को–आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची शिफारस स्वीकारण्यात आली. या शिफारशीत शिक्षकांचे अधिकार व जबाबदाऱ्या, शिक्षकांची पूर्वतयारी व पुढील प्रशिक्षण, भरती, नियुक्ती तसेच अध्यापन व कार्यपरिस्थिती यांसंबंधी आंतरराष्ट्रीय मानदंड निश्चित करण्यात आले. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ १९९४ पासून दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन साजरा केला जातो. म्हणून हा दिवस केवळ शिक्षकांचा गौरव करण्याचा दिवस नाही; तर शिक्षकांच्या कार्याचा, त्यांच्या व्यावसायिक विकासाचा, अधिकारांचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याचा दिवसआहे.
शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केवळ अभ्यासक्रम, पुस्तके किंवा तंत्रज्ञान पुरेसे नसते; त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित, प्रेरित आणि सन्मानित शिक्षक आवश्यक असतो. याच व्यापक जाणिवेतून शिक्षकांच्या व्यावसायिक व सामाजिक स्थितीबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार झाला. १९६६ मधील युनेस्को–आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या शिफारशीने शिक्षकांच्या अधिकारांबरोबरच त्यांच्या जबाबदाऱ्या, प्रशिक्षण, रोजगाराच्या अटी आणि अध्यापनासाठी आवश्यक परिस्थिती यांना आंतरराष्ट्रीय चौकट दिली. त्यामुळे शिक्षक हा केवळ शिक्षण देणारा कर्मचारी नसून शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि समाजाच्या भवितव्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
ही भूमिका अधोरेखित झाली.यानंतर १९९४ मध्ये युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस जगभरातील शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर विचार करण्यासाठी महत्त्वाचा दिवस ठरला आहे.
२०२६ हे वर्ष या संदर्भात विशेष महत्त्वाचे आहे. कारण १९६६ मधील या ऐतिहासिक शिफारशीला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर २०२६ च्या आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची अधिकृत संकल्पना “शिक्षकांच्या पाठीशी उभे राहणे : शिक्षक व्यवसायाचे संरक्षण, त्याचा दर्जा उंचावणे आणि भविष्य घडविणे.” युनेस्कोने २०२६ मध्ये शिक्षकांच्या बदलत्या भूमिका, त्यांच्या व्यावसायिक व सामाजिक दर्जासमोरील आव्हाने, कार्यपरिस्थिती आणि त्यांना आवश्यक असलेल्या समर्थनावर विशेष भर दिला आहे.
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ आहे. शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकातील धडे शिकवणारी व्यक्ती नव्हे. तो विद्यार्थ्याच्या मनात जिज्ञासा निर्माण करणारा, विचारांना चालना देणारा, स्वप्नांना दिशा देणारा आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. माहिती सहज उपलब्ध असलेल्या आजच्या युगात शिक्षकाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट माहितीच्या प्रचंड प्रवाहातून योग्य माहिती निवडणे, तिची सत्यता तपासणे, तिचे विश्लेषण करणे आणि तिचा योग्य उपयोग करणे यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याची जबाबदारी शिक्षकावर अधिक आली आहे. शिक्षक विद्यार्थ्याला केवळ काय शिकायचे हे सांगत नाही, तर कसे शिकायचे, का शिकायचे आणि शिकलेल्या ज्ञानाचा समाजाच्या हितासाठी कसा उपयोग करायचा, हेही शिकवतो.
ज्ञानासोबत संस्कारांची शिदोरी देखील काळाची गरज निर्माण झालेली आहे. म्हणूनच शिक्षणाचा खरा अर्थ केवळ परीक्षेतील गुण किंवा पदवी मिळविणे असा नाही. शिक्षणातून विचारशील, संवेदनशील, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिक घडणे अपेक्षित आहे. प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम, सहकार्य, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि मानवतेचा आदर यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यात शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.शिक्षकाचे स्वतःचे आचरण विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत उदाहरण असते. वर्गात शिकविलेला धडा काही काळ लक्षात राहतो; परंतु शिक्षकाने दिलेला संस्कार आयुष्यभर सोबत राहू शकतो.म्हणूनच शिक्षक हा ज्ञानाचा प्रसारक असण्याबरोबरच मूल्यांचा संवाहक आहे.
एकविसाव्या शतकातील शिक्षणव्यवस्था वेगाने बदलत आहे. डिजिटल साधने, ऑनलाइन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत. आजच्या काळात शिक्षकाची भूमिका माहिती देणाऱ्यापेक्षा मार्गदर्शक, सल्लागार, प्रेरणादाता आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणारा सहकारीअशी होत आहे. तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना माहिती देऊ शकते; परंतु विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार योग्य दिशा देणे, त्याच्या चुका समजून घेणे, आत्मविश्वास वाढविणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावून देणे यासाठी शिक्षकाची मानवी भूमिका आवश्यक आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, नैतिकता आणि जबाबदारीने तंत्रज्ञान वापराची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षणातील तंत्रज्ञान हे शिक्षकाला पर्याय देणारे नसून त्याच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनविणारे साधन ठरू शकते.
शिक्षक आणि विद्यार्थी हे एक विश्वासाचे नाते असते. शिक्षणाची खरी सुरुवात विश्वासातून होते. विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य, स्वतःचे मत व्यक्त करण्याची संधी आणि चुका सुधारून त्यातून शिकण्याची मुभा मिळाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमता, आवडी आणि अनुभवांसह वर्गात येतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करणे ही शिक्षकाची महत्त्वाची जबाबदारी आहे. शिक्षक विद्यार्थ्याला फक्त उत्तर देत नाही; तो विद्यार्थ्याला स्वतः उत्तर शोधण्यास शिकवतो.हीच शिक्षणाची खरी ताकद आहे.
शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा प्रभावी घटक बनला आहे.शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविण्याची क्षमता शिक्षकामध्ये असते. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व यांसारख्या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो. आज डॉक्टर, अभियंते, संशोधक, प्रशासक, उद्योजक, शास्त्रज्ञ, कलाकार आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या असंख्य व्यक्तींच्या जडणघडणीत त्यांच्या शिक्षकांचा वाटा आहे. त्यामुळे शिक्षकाचे कार्य हे वर्तमानापुरते मर्यादित नसून भविष्य घडविणारे कार्य आहे.
शिक्षण क्षेत्र सतत बदलत असल्यामुळे शिक्षकांनीही सतत शिकत राहणे आवश्यक आहे. नवीन अध्यापन पद्धती, तंत्रज्ञान, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, विद्यार्थिकेंद्रित शिक्षण आणि बदलत्या सामाजिक गरजा यांचा अभ्यास शिक्षकांसाठी आवश्यक झाला आहे.
युनेस्कोच्या मते, शिक्षकांच्या कार्यपरिस्थिती आणि त्यांना मिळणारा आधार हा गुणवत्तापूर्ण शिक्षणाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे शिक्षकांना योग्य प्रशिक्षण, व्यावसायिक विकासाच्या संधी आणि सक्षम कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही शिक्षणव्यवस्थेची महत्त्वाची जबाबदारी आहे.शिक्षक स्वतः शिकत राहतो तेव्हाच तो विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सत्कार, शुभेच्छा आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र शिक्षकांचा खरा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहता कामा नये.शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी आवश्यक साधने, प्रशिक्षण, तंत्रज्ञान, संशोधनाच्या संधी, सकारात्मक कार्यपरिस्थिती आणि सन्मान मिळणे आवश्यक आहे. शिक्षक सक्षम असेल तर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची शक्यता अधिक बळकट होते.म्हणून शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षणाचा सन्मान आणि शिक्षणाचा सन्मान म्हणजे राष्ट्राच्या भविष्याचा सन्मान होय.
राष्ट्रनिर्मिती ही केवळ आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा किंवा तंत्रज्ञानाच्या विकासातून होत नाही. राष्ट्राची खरी ताकद त्याच्या विचारशील, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि जबाबदार नागरिकांमध्ये असते. अशा नागरिकांची जडणघडण शिक्षणातून होते आणि शिक्षणाच्या केंद्रस्थानी शिक्षक असतो.आजचा विद्यार्थी उद्याचा शास्त्रज्ञ, प्रशासक, उद्योजक, संशोधक, व्यावसायिक किंवा समाजसेवक असणार आहे. त्यामुळे आज शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनात रुजवलेला प्रत्येक सकारात्मक विचार उद्याच्या समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतो.याच अर्थाने वर्गखोली ही राष्ट्रनिर्मितीची पहिली प्रयोगशाळा आणि शिक्षक हा त्या प्रक्रियेचा प्रमुख मार्गदर्शक आहे.
५ ऑक्टोबरचा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांच्या गौरवाचा दिवस नाही; तो ज्ञान, संस्कार, जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीच्या मूल्यांचा उत्सव आहे. १९६६ मध्ये शिक्षकांच्या अधिकार, जबाबदाऱ्या, प्रशिक्षण आणि कार्यपरिस्थितीबाबत स्वीकारलेल्या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय शिफारशीचे स्मरण म्हणून १९९४ पासून साजरा होणारा हा दिवस आज अधिक व्यापक अर्थ घेऊन आपल्या समोर उभा आहे.तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही सक्षम झाली आणि ज्ञानाची साधने कितीही व्यापक झाली तरी विद्यार्थ्याच्या मनातील जिज्ञासेला दिशा देणारा, त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा आणि त्याला माणूस म्हणून घडविणारा शिक्षक आवश्यकच राहणार आहे.
“ज्ञानातून विचार, विचारातून विवेक, विवेकातून संस्कार आणि संस्कारातून जबाबदार नागरिक घडतो. या संपूर्ण प्रवासाचा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक.” म्हणूनच
“शिक्षक घडवतो विद्यार्थी, विद्यार्थी घडवतो समाज आणि समाज घडवतो राष्ट्र.”
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ज्ञानदान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचे व्रत जपणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक अभिवादन!
लेखक
डॉ. मिनीनाथ अनारसे
सहाय्यक प्राध्यापक,
कृषी विस्तार शिक्षण विभाग,
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय,
वडगाव गुप्ता (विळद घाट), अहिल्यानगर.
मो. नं. : ९६६५२७८२८०





