ग्रामपंचायत कर व NOC प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
करमाळा प्रतिनिधी
विहाळ : विहाळ गावातील शिवगिरी ॲग्रो कारखान्याच्या कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, सन २०२२ पासून ग्रामपंचायतीचा देय कर भरला गेला आहे की नाही, याची अधिकृत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच साखर गाळप हंगामासाठी आवश्यक असलेल्या ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्राच्या (NOC) सत्यतेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरवर्षी साखर गाळप हंगाम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीची NOC आवश्यक असताना संबंधित कागदपत्रे खरी आहेत की बनावट, याची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. NOC बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या अधिकारांचा व लोकप्रतिनिधींचा अवमान होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या प्रकरणात सरपंच व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी संपूर्ण गाव ठामपणे उभे असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
शिवगिरी ॲग्रोने २०२२ पासून ग्रामपंचायतीला भरलेला किंवा थकीत असलेला कर, दरवर्षी सादर करण्यात आलेल्या NOCची सत्यता तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक अथवा प्रशासकीय फसवणूक झाली आहे का, याची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“गावाच्या हक्कांशी आणि ग्रामपंचायतीच्या अधिकारांशी कोणालाही खेळता येणार नाही. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा विहाळ ग्रामस्थांनी दिला.
या प्रकरणाकडे प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि चौकशीत नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











