गावपातळीपासून तालुक्यापर्यंत संघटनात्मक बांधणी करा; जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करा – आ. अंबादास दानवे
सिल्लोड | प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे. गावपातळीपासून तालुकापातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी करून जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी केले.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी सिल्लोड येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. अंबादास दानवे यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, जालना जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, संजय काळात्रे आणि रघुनाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीला तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाची संघटनात्मक बांधणी कशी करावी, याबाबत आ. दानवे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सिल्लोड तालुक्यातील गावांची संख्या, प्रत्येक गावात शाखाप्रमुखांची नियुक्ती तसेच महिला पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विभागप्रमुख, उपविभागप्रमुख आणि तालुका उपप्रमुखांना यावेळी नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आ. दानवे म्हणाले की, तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये आढावा बैठका आयोजित कराव्यात. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत समस्या तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत मांडाव्यात. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जनतेचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटले, तरच जनता आपल्या सोबत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत किती जणांना मिळाली, किती जणांना मिळाली नाही, तसेच लाडक्या बहिणींचे किती लाभार्थ्यांचे पैसे बंद झाले आहेत, याची माहिती संकलित करण्याचे आवाहन केले. ही माहिती प्रशासन आणि पक्षापर्यंत पोहोचवून संबंधित प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला उपनेते सुभाष पाटील, जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, संजय काळात्रे, रघुनाथ चव्हाण, पत्रकार प्रकाश वराडे, प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, शिवा दादा गौर, सोमीनाथ बडक, विठ्ठल खिल्लारे, सखाराम हिवाळे, मच्छिंद्र घाडगे, किशोर लोखंडे, रामेश्वर एंडोले, माधव गुंजाळ, गजानन जयस्वाल, ॲड. वैभव तायडे, अमोल शिंदे, नारायण आहेर, बाबुराव खंबाट, लक्ष्मण बडक, कृष्णा पांडे, महेंद्र बावस्कर, रामेश्वर जंजाळ, गणेश काळे, दिनेश तांबे, शिवाजी मानकर, दौलत गोंगे, कैलास चव्हाण, रामदास चाथे, कृष्णा काकडे, वाल्मीक मोरे, बाळू हिवरे, गोरख शिंदे, डॉ. राजू वरपे, राजेंद्र ढवळे, जय जयस्वाल, नारायण काळे, भगवान शिंबरे, सुनील अंभोरे, तात्याराव दिवटे, सुनील शिंदे, महादेव पल्लाळ, सचिन साळवे, भास्कर तायडे, राजू दांडगे, योगेश फुके, शंकर सरोदे आणि अजय डापके यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर यांनी केले, तर आभार तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी मानले.










