आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन; शैलजा गायकवाड यांच्याकडून १ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत
नारायणगाव प्रतिनिधी
नारायणगाव : मुक्ताई काळोबा देवस्थान, नारायणगाव (ता. जुन्नर) यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी जिल्हा परिषद सदस्या दिवंगत आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खैरे, नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे, डॉ. सदानंद राऊत आदी उपस्थित होते. सामाजिक उपक्रमाला हातभार लावत दिवंगत नामदेव शंकर गायकवाड यांच्या पत्नी शैलजा यांनी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश देऊन मदत केली.
दरम्यान, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिरात दिवंगत आशाताई बुचके यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जुन्नर तालुक्यातील विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. आशाताई बुचके यांनी अनेकांची कामे मार्गी लावण्यासाठी केलेल्या योगदानाचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
आशाताई बुचके यांच्या कन्या ज्योती दुराफे यांनी आईचे सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.











