भारतीय सैन्यदलात ३० वर्षे देशसेवा; ग्रामस्थांकडून भव्य रॅली काढून सन्मान
राधानगरी प्रतिनिधी :
गुडाळवाडी (ता. राधानगरी) : गुडाळवाडी गावचे सुपुत्र श्री. कृष्णा श्रीपती मोहिते (ऑनरेरी लेफ्टनंट) यांनी भारतीय सैन्यदलात तब्बल ३० वर्षे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा भव्य गौरव सोहळा शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी गुडाळेश्वर मंगल कार्यालय, गुडाळ येथे उत्साहात पार पडला.
देशसेवेचे ३० वर्षांचे कर्तव्य पूर्ण करून गावात परतलेल्या श्री. मोहिते यांचे सकाळी साडेनऊ वाजता गावातून भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुडाळेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. पाटील होते. प्रमुख उपस्थितांमध्ये तंटामुक्त अध्यक्ष महादेवराव ज्ञानू कोथळकर, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. बी. माळवी, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे जयसिंगराव हुजरे जाधव, संग्राम शिवाजी पाटील, लक्ष्मीकांत विलासराव हंडे, आनंदराव मारुती मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन विजय मोहिते यांनी केले, तर प्रकाश हुजरे यांनी आभार मानले. उपस्थितांसाठी दुपारी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
३० वर्षे देशसेवा करून परतलेल्या आपल्या सुपुत्राचा ग्रामस्थांनी अभिमानाने केलेला सन्मान हा गुडाळवाडीच्या देशप्रेमाची भावना अधोरेखित करणारा ठरला. या गौरव सोहळ्याबद्दल परिसरातून श्री. कृष्णा मोहिते यांचे कौतुक होत आहे.










